Skip to main content

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा यांचा परिचय.

By March 10, 2026Articles, Mumbai News
kallianpurdotcom: Mob 9741001849
– Rons Bantwal

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा हे त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातून आलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत.

माणिक्य राजघराणे हे भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असून ते प्रगत विचारसरणीसाठी ओळखले जाते. या राजघराण्याने सन १९४१ साली त्रिपुरासाठी पहिली लिखित राज्यघटना लागू केली होती. नागरिकांमध्ये स्वावलंबन, सहकार्य आणि राज्यनिष्ठा यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हे राज्यघटनेचे उद्देश होते.

या राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि कामगारांसाठी विधानसभेत जागांचे आरक्षण देण्यात आले होते. देशभरात आरक्षणाची संकल्पना रुजण्यापूर्वीच त्रिपुराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आधुनिक विचारांचा अवलंब करण्यात आला होता.

राजघराण्याची पार्श्वभूमी असूनही श्री. जिष्णु देव वर्मा अत्यंत विनम्र, सहज उपलब्ध आणि सर्व स्तरांतील लोकांशी संवाद साधण्यास उत्सुक असलेले व्यक्तिमत्त्व आहे.

त्यांनी १९९३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्रिपुराचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी त्रिपुरा प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणूनही कार्य केले आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळली.

सन २०१८ मध्ये त्यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल  ८९.३३ टक्के मते मिळवत अभूतपूर्व विजय मिळवला.

सन २०१८ साली त्रिपुरामध्ये २५ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या कारकिर्दीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि श्री. जिष्णु देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या काळात त्यांनी वित्त, ग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकल्पांची अंमलबजावणी, आर्थिक संसाधनांची उपलब्धता आणि ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.

त्रिपुरामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेला बायो व्हिलेज 2.0 हा त्यांचा एक अभिनव उपक्रम आहे. कृषी, ऊर्जा आणि उपजीविकेच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी आणि कुटुंबांनी हरित तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारल्या. त्यामुळे शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्रिपुराने अग्रस्थान मिळवले. पुढे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट उपक्रम म्हणून मान्यता मिळाली.

ईशान्य भारताच्या विकासासाठी धोरण निर्मितीमध्ये श्री. जिष्णु देव वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन १९८९ ते १९९३ या काळात ते नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) च्या त्रिपुरा विभागाचे संयोजक म्हणून कार्य केले आणि ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक म्हणून  केले.

अनेक कलागुणांनी संपन्न असलेले श्री. जिष्णु देव वर्मा यांना आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड आहे. त्यांच्या सर्जनशील कलाकृतींमध्ये विविध कलागुणांची अभिव्यक्ती दिसून येते. संस्कार भारतीच्या सहकार्याने त्यांच्या अनेक कलाकृती विविध पर्यटनस्थळे, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. ते एक प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत.

बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या Children of Water Goddess आणि Master of Time या पुस्तकांमधील साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावी आणि भावस्पर्शी मानली जाते. त्यांच्या मते जीवन हा एक गहन प्रवास आहे—ज्यात प्रत्येक क्षण हा एक पवित्र आहुती आहे आणि प्रत्येक आव्हान हे ज्ञान व धैर्य वाढविण्याची संधी आहे. त्यांच्या कवितेतील शब्दांत ते असे म्हणतात—

Let us carry hope in our souls,
Not only for ourselves,
But for those too,
Who look upon us with hope.”

आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य तसेच कला आणि संस्कृती यांप्रती त्यांची अत्यंत निष्ठा आणि बांधिलकी आहे.

दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी श्री जिष्णु देव वर्मा यांची  तेलंगणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली होती.

दिनांक १० मार्च २०२६ रोजी ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. आपल्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते सर्व स्तरांतील लोकांशी सहजतेने संवाद साधतात आणि सामान्य नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असतात.

समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे यातच जीवनाचे सार्थक आहे असे ते मानतात.

Leave a Reply

Disclaimer: Please write your correct name and email address. Kindly do not post any personal, abusive, defamatory, infringing, obscene, indecent, discriminatory or unlawful or similar comments. www.kallianpur.com will not be responsible for any defamatory message posted under this article.

Hence, sending offensive comments using Kallianpur.com will be purely at your own risk, and in no way will kallianpur.com be held responsible.